बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती तालुक्याचा मॅरेथॉन दौरा केला. या दौऱ्याला गावोगावी ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेत अजितदादांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असून माझ्याकडे महत्वाचं पद असेल असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला आहे.
बारामती तालुक्यातील अनेक गावात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धावता दौरा केला. पहाटे साडेसहा वाजताच अजितदादांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्याला गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी महिला भगिनींनी अजितदादांची भेट घेत लाडकी बहीण योजनेबद्दल आभार मानले. तर अनेक शेतकऱ्यांनी वीजबिल माफीबद्दल समाधान व्यक्त केले.
लोकसभेला जे झालं ते गंगेला मिळालं. आता आपल्या बारामती तालुक्याचा अधिक फायदा व्हावा यासाठी पुन्हा एकदा आपला प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं. निवडणूक काळात तुम्हाला आता पुन्हा भावनिक केलं जाईल. मात्र आता भावनिक न होता कामाच्या माणसाला मतदान करा असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अजितदादांनी राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी आपल्याकडे महत्वाचं पद असेल असंही सांगायला अजितदादा विसरले नाहीत.





