इंदापूर : न्यूज कट्टा
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत इंदापूरमध्ये शरद पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना भक्कम साथ देणारे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे आपल्या समर्थकांसह उद्या बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे प्रवेश सोहळा आणि जाहीर सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. तत्पूर्वी आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा आणि प्रवीण माने यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत या प्रवेशाला विरोध केला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या तिघांनी परिवर्तन मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर केली होती.
दरम्यानच्या काळात आप्पासाहेब जगदाळे हे तटस्थ भूमिकेत होते. मात्र त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता निमगाव केतकी येथे आप्पासाहेब जगदाळे हे आपल्या समर्थकांसह अजितदादांच्या उपस्थितीत होत असलेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, आप्पासाहेब जगदाळे यांच्या प्रवेशामुळे दत्तात्रय भरणे यांचे पारडे जड होणार असून हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या निमगाव केतकीत अजितदादांच्या उपस्थितीत होत असलेल्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





