शिरूर : न्यूज कट्टा
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गिलबिले यांच्या राहत्या घरासमोरच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दुपारच्या वेळेत दत्तात्रय गिलबिले (वय ५१) हे आपल्या बंगल्यासमोर असलेल्या आवारात बसलेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. यात दत्तात्रय गिलबिले हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पुण्यात नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जमिनीचा वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून घटनास्थळासह अन्य ठिकाणांची पाहणी केली आहे. तसेच पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकही रवाना केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांनी दिली आहे.





