बारामती : न्यूज कट्टा
राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली असून उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे यांच्यासह बारामती तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, या भेटीमुळे येणाऱ्या काळात बारामतीच्या राजकारणात नवीन समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
चंद्रराव तावरे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मुंबईत अजितदादांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. याचवेळी उपस्थितांनी अजितदादांशी विविध विषयांवर चर्चा केली. आगामी काळात आवश्यक तिथे धोरणात्मक निर्णय घेतले जातील, तसेच तालुक्यात निधीची कमतरता भासणार नाही असं यावेळी अजितदादांनी आश्वासित केलं.
या भेटीवेळी पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीपराव खैरे, पोपट खैरे, युवराज तावरे, ॲड. शाम कोकरे, अशोक कोकणे, प्रकाश काळखैरे, भाऊसाहेब मोरे, नितीन मदने, अजित जाधव, पणदरेचे माजी सरपंच पिनू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, चंद्रराव तावरे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बालपणापासूनचे मित्र आहेत. विधानसभा निवडणूक काळात शरद पवार यांनी चंद्रराव तावरे यांची सांगवी येथील जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील यशानंतर चंद्रराव तावरे यांनी थेट मुंबईत जाऊन अजितदादांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात बारामतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.





