बारामती : न्यूज कट्टा
एकदा शब्द दिला की तो पूर्णच करायचा अशी अजितदादांची खासीयत सर्वश्रुत आहे. बारामती शहरातील वसंतराव पवार मार्गावर असलेलं दत्त मंदिराचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत आला होता. सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहिता संपताच मंदिराचं काम करण्याचा शब्द दिला होता. आज श्रीदत्त जयंतीचं औचित्य साधत अजितदादांनी सकाळी या जागेची पाहणी केली आणि संध्याकाळी मंदिराच्या कामाचं भूमीपूजनही केलं. त्यामुळंच दिलेला शब्द पाळणाऱ्या दादांच्या कामाची प्रचिती पुन्हा एकदा बारामतीकरांना आली.
बारामती शहरातील वसंतराव पवार मार्गावर नीरा डाव्या कालव्याचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. या ठिकाणी असलेलं दत्त मंदिर प्रशस्त जागेत उभारण्याचा मानस अजितदादांनी व्यक्त केला होता. विधानसभा निवडणुकीत या मंदिरावरून विरोधकांनी अजितदादांवर आरोप केले होते. त्यानंतर झालेल्या सांगता सभेत आचारसंहिता संपताच या मंदिराचं काम हाती घेऊ असा शब्द अजितदादांनी दिला होता.
निवडणुकीनंतर आज बारामतीत खासगी दौऱ्यावर आल्यानंतर अजितदादांनी आपला ताफा थेट आमराई येथे नियोजित मंदिराच्या जागेकडे वळवला. त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आजच मंदिराच्या कामाचं भूमिपूजन घेण्याच्या सूचना केल्या. सायंकाळी ५ वाजता अजितदादांनी दत्त मंदिराच्या कामाचं भूमीपूजनही केलं. भव्य मंदिरासह या ठिकाणी उद्यानही तयार करण्याच्या सूचना अजितदादांनी दिल्या आहेत.
दिलेला शब्द पाळणारा नेता असं अजितदादांबद्दल नेहमीच म्हटलं जातं. त्याची प्रचिती आज बारामतीकरांना आली. आज श्रीदत्त जयंती दिवशीच दादांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला. आता या ठिकाणी भव्य मंदिराबरोबरच नागरिकांना उद्यानही उपलब्ध होणार आहे. त्यामुळं येथील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.





