SATISH WAGH MURDER : सहा महिन्यांपासून रचला जात होता सतीश वाघ यांच्या हत्येचा कट; कारमध्येच धारदार शस्त्राने केले ७२ वार..!

पुणे : न्यूज कट्टा 

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा उद्योजक सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. त्याचवेळी गेल्या सहा महिन्यांपासून सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला जात होता ही बाबही आता तपासात निष्पन्न झाली आहे. सतीश वाघ यांचं अपहरण झाल्यानंतर कारमध्येच त्यांच्यावर ७२ वार करण्यात आल्याचं आणि हत्येसाठी वापरलेला चाकू भीमा नदीपात्रात टाकून दिल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.

उद्योजक असलेले सतीश वाघ हे दि. ९ डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी ब्ल्यू बेरी हॉटेलजवळ चारचाकीतून आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं होतं. दरम्यान, ९ डिसेंबर रोजी रात्रीच सतीश वाघ यांचा मृतदेह मिळून आला होता. त्यामध्ये वाघ यांच्यावर ७२ वेळा वार करत त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं होतं. तसेच सतीश वाघ यांचे गुप्तांगही कापण्यात आलं होतं.

या प्रकरणी पोलिसांनी मोहिनी वाघ हिच्यासह पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. गणेश नगर, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८, रा. बजरंगनगर, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय ३२, रा. विघ्नहर्ता सोसायटी, फुरसुंगी फाटा) यांना अटक केली आहे.

सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिनेच आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याचं कबूल करत ही हत्या घडवून आणल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. मोहिनी वाघ हिने संपत्तीचा ताबा मिळवण्यासाठी आणि अनैतिक संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी ही हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर कारमध्येच त्यांच्यावर तब्बल ७२ वार करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून हत्येसाठी वापरलेला चाकू भीमा नदीत फेकून दिल्याची कबुली आरोपींकडून देण्यात आली आहे.

आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी हत्येसाठी वापरलेले हत्यार पेरणे फाटा येथे भीमा नदी पात्रामध्ये फेकून दिले. आता पोलिसांकडून या दोघांची चौकशी करून हत्याराचा शोध घेतला जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

अशी केली सतीश वाघ यांची हत्या

९ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सतीश वाघ मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या चारचाकी वाहनात आलेल्या चौघांनी त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर पुढील दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली. वाघ यांच्यावर चाकूने तब्बल ७२ वार करण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार करण्यात आले होते.

सहा महिन्यांपासून सुरू होतं प्लॅनिंग

सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला बुधवारी दि. २६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. मोहिनी आणि अक्षय जावळकर यांच्यातील प्रेम संबंधांची सतीश वाघ यांना कुणकुण लागली होती. त्यातून या दोघांमध्ये सातत्याने वाद सुरू होते. त्यामुळं मोहिनीने अक्षयला सांगून आपल्या पतीला संपवण्याचं प्लॅनिंग सुरू केलं होतं. तब्बल सहा महिन्यांपासून सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला जात होता ही बाब तपासात समोर आली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!