बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींवर स्थानिक प्रशासन मेहरबान असल्याचं पहायला मिळत आहे. अंतिम फायर एनओसी नसलेल्या अकॅडमींवर कारवाईचे आदेश होऊन चार महीने उलटून गेल्यानंतरही एकाही अकॅडमीवर कारवाई झालेली नाही. उलट ‘इंटीमेशन नोटिस’ या गोंडस नावाखाली अकॅडमींना वाचवण्याचाच प्रकार सुरू आहे. स्थानिक अधिकाऱ्यांची ‘मिलीभगत’ असल्यामुळे या अकॅडमींचं फावत असून जाणीवपूर्वक कारवाईत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केला आहे.
बारामती शहरातील अकॅडमींना बारामती नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाकडून तात्पुरत्या एनओसी देण्यात आल्या होत्या. यावर आक्षेप घेत मोहसीन पठाण यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि आंदोलन करत या बेकायदेशीर अकॅडमींवर कारवाईची मागणी केली होती. तसेच या एनओसीसंदर्भातील कागदपत्रेही माहिती अधिकारात मागवली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा करत माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. त्यामुळं या तात्पुरत्या एनओसी देण्यामागे काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त करत या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीची मागणी पठाण यांनी केली होती.
याबाबत मोहसीन पठाण यांनी वरिष्ठांकडे तक्रार दिल्यानंतर नगरविकास विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तात्काळ माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाकडून कागदपत्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे अग्निशमन अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्याअन्वये निलंबनाची कारवाई करण्याच्या आणि संबंधित अकॅडमी सील करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच आजवर कागदपत्रे का दिली नाहीत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
नगरविकास विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाला जवळपास तीन महीने उलटून गेले आहेत. मात्र आजवर एकाही अकॅडमीवर कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या अकॅडमींना वाचवण्यासाठी ‘इंटीमेशन नोटीस’ या गोंडस नावाखाली अग्निशमन व्यवस्था उभारण्याबाबत अग्निशमन अधिकाऱ्यांनी सुचवले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या या मनमानीला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठीशी घातले जात असल्याचं या निमित्तानं स्पष्ट होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद
वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानंतरही संबंधित अग्निशमन अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी आणि बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारीही कोणतीच कारवाई करत नाहीत. अग्निशमन अधिकाऱ्यांना या अकॅडमींकडून मोठ्या प्रमाणात लाभ होत असून त्यातून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही खूश ठेवत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे तर बेकायदेशीर अकॅडमींना स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षा कवच मिळत नाही ना असा सवाल मोहसीन पठाण यांनी उपस्थित केला आहे.





