BARAMATI CRIME : बारामतीत सेवानिवृत्त फौजदाराचं घर भरदिवसा फोडलं; साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरात भिगवण रस्त्यावर एका सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराचं घर भरदिवसा फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार बाळासाहेब पानसरे (रा. शेफाली गार्डन, सम्यक चौक, बारामती) यांनी याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवार दि. २८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पानसरे हे आपल्या एका नातेवाईकांच्या वर्षश्राद्धासाठी इंदापूर तालुक्यातील अकोले येथे गेले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पानसरे यांच्या पत्नी संगीता आणि मुलगी फ्लॅटला कुलूप लावून नातेवाईकांना दवाखान्यात गेल्या होत्या.

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पत्नी आणि मुलगी घरी परतल्यानंतर फ्लॅटचे दार उघडे दिसले. आत जाऊन पाहणी केल्यानंतर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं आणि घरातील दागिने, रोख रक्कम चोरून नेल्याचं त्यांना आढळून आलं. त्यांनी तात्काळ आपले पती बाळासाहेब पानसरे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पानसरे यांनी घरी येवून पाहणी केली आणि याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली.

पानसरे यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून गंठण, झुमके, मंगळसूत्र, अंगठी असे साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि ३० हजार रुपये रोख असा सुमारे ३ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

     

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!