पुणे : न्यूज कट्टा
आपल्या मुलीशी बोलतो या कारणावरून वडील आणि दोन मुलांनी लोखंडी गजाने मारहाण करत दगड डोक्यात घालून एका १७ वर्षीय युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वाघोली परिसरातील गोरेवस्ती येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी वडील आणि दोघा मुलांना अटक करण्यात आली आहे.
गणेश वाघू धांडे (वय १७, रा. गोरेवस्ती, वाघोली) असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६१), सुधीर पेटकर (वय ३२) आणि नितीन पेटकर (वय ३१) या तिघा बापलेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेश धांडे हा आपल्या मुलीशी मैत्री करून बोलत असतो ही बाब पेटकर पिता-पुत्रांना माहिती झाली होती. याबाबत त्यांनी गणेशला समजही दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांचं बोलणं सुरूच होतं.
आज दि. २ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणेश धांडे हा आपल्या मित्रांसह दुचाकीवरून घराजवळ येत होता. त्यावेळी पेटकर पिता-पुत्रांनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान, लोखंडी गज आणि दगडाने त्याच्या डोक्यात घाव घातले. त्यानंतर हे तिघे आरोपी पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मयत गणेशचे वडील वाघू मारुती धांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण पेटकर, सुधीर पेटकर आणि नितीन पेटकर यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. वाघोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे अधिक तपास करत आहेत.





