पुणे : न्यूज कट्टा
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याबाबत गेले काही दिवस चर्चा रंगल्या होत्या. आता पुण्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं अजितदादाच पुण्याचे कारभारी असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
महायुती सरकार स्थापनेनंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्रीपदाची धुरा अजितदादांवरच असल्यामुळे पुन्हा त्यांच्याकडेच ही जबाबदारी येईल अशीही शक्यता वर्तवली जात होती. अशातच आता पुण्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा अजितदादांकडेच येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यासह अन्य जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादांकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अन्य जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
काही अपवाद वगळता गेल्याअनेक वर्षांपासून अजितदादा पुण्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्यात आपलं वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच आता अजितदादांना पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळणार असल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचं बळ अधिक वाढेल असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही दादांकडेच..?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पांकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी स्थानिक आमदारांनी फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे. अशातच आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही अजितदादांकडेच राहणार असल्याची माहिती पुढे येत आहे.





