मुंबई : न्यूज कट्टा
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्षपदावर राहून आपण दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवू शकत नसल्याचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं असून आगामी काळात दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभं करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा असलेले दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन करण्यात आले. परंतु आजवर दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी या मंत्रालयाचे कामकाज सुरू झाले नाही अशी खंत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. पदाचा राजीनामा देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले आहेत.
या पदावर राहुन हे काम होणार अशी शक्यता मला मावळताना दिसत आहे. दिव्यांगासोबत बेईमानी मला शक्य नाही. त्यासाठी माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान, अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तो मंजुर करुन सहकार्य करावे. तसेच मला असलेली सुरक्षा सुध्दा काढुन टाकावी व कुठलीही सुरक्षा ठेवण्यात येऊ नये, असेही बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
या पत्रात त्यांनी दिव्यांग बांधवांचे प्रश्नही अधोरेखीत केले आहेत. यामध्ये इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे, मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही, स्थानिक स्वराज्य संस्था 5 टक्के निधी खर्च करत नाही, अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिवही नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही. पदभरती नसल्याचे नमूद करत इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाहीत, या पदावर राहून ते होणार, अशी शक्यता मावळली असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.





