बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरात कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत थेट येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी ही कारवाई केली आहे. बारामती शहर आणि परिसरात टवाळखोरी केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही बिरादार यांनी दिला आहे.
बारामती शहरात सोशल मिडियाच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला होता. दरम्यानच्या काळात, बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या यश दीपक मोहिते, शुभम उर्फ बाळू काळू जगताप, आदित्य राजू मांढरे (रा.अमराई, बारामती) आणि अनिकेत केशवकुमार नामदास (रा. दीपनगर, भवानीनगर, ता. इंदापूर) या चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असून या प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती कार्यालयास पाठवलेला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
टवाळखोरांना पोलिसांचा इशारा
सोशल मिडियातून दहशत निर्माण होईल असे स्टेटस ठेवल्यास किंवा टवाळखोरी केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. जागरूक नागरिकांनी अशा पद्धतीचे स्टेटस सोशल माध्यमावर ठेवलेल्या इसमांचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना पाठवल्यास संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच याबद्दल माहिती देणारांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले. शक्ती क्रमांक : 9209394917
जागरूक पालक, शिक्षकांनी, तसेच नागरिकांनी शहरातील चौकाचौकात टवाळखोरी करणाऱ्या, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाडी करणाऱ्या, उघड्यावर मद्य प्राशन करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबरवर पाठवावी, त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.





