सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २८०० रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी गाळप झालेल्या उसाची रक्कम १० जानेवारी रोजी सभासदांना अदा केली जाईल अशी माहिती या कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पहिला हप्ता प्रतिटन २८०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. एफआरपीनुसार प्रतिटन २६०५ रुपये इतका दर बसत आहे. यामध्ये प्रतिटन १९५ रुपये अधिकचे दिले जाणार असल्याचं पुरुषोत्तम जगताप यांनी यावेळी सांगितलं. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत गाळप झालेल्या उसाची रक्कम १० जानेवारी रोजी अदा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एफआरपीच्या नवीन सूत्रानुसार १०.२५ टक्के साखर उताऱ्यानुसार पहिला हप्ता निश्चित केला जातो. तर हंगाम संपल्यानंतर अंतिम दर निश्चित केला जातो. यावर्षीच्या हंगामात सोमेश्वर कारखान्याचा अंतिम दर ३१२० ते ३१५० रुपये राहण्याची शक्यता असून सभासदांना उर्वरीत रक्कम ही हंगाम संपल्यानंतर अदा केली जाईल अशी माहितीही जगताप यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे सोमेश्वर राज्यात विक्रमी ऊस दर देणारा कारखाना ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





