पुणे : न्यूज कट्टा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत जो दोषी असेल, त्यांच्यावर पक्ष न पाहता त्वरीत कारवाई केली जाईल असं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबद्दल विचारणा केली असता अजित पवार म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन अशी तीन स्तरावर चौकशी सुरु आहे. या चौकशीत जो कोणी दोषी असल्याचं सिद्ध होईल, त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल.
ही चौकशी होत असताना पक्ष न पाहता वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती दोषी असले तरी त्यांची गय केली जाणार नाही. या प्रकरणात प्रत्येकाची चौकशी होऊन कुणाकुणाला फोन झाले, किती वेळ बोलणं झालं, या सर्व प्रकरणात कोण आहे हे सगळं समजणार असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. या प्रकरणात सरकारने गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
माझी कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. दोषींना कडक शिक्षा करण्यात येईल. काहीजण या प्रकरणात वेगवेगळे आरोप करतात. मी त्यांनाही केवळ आरोप करण्यापेक्षा संबंधित पुरावे तपास यंत्रणेला द्यावेत असं सांगितलं आहे. तसेच महायुतीतील नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकार म्हणून आमची जबाबदारी अधिक असून यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.





