BARAMATI CRIME : रम्मी अन् व्यसनानं त्यांना बनवलं चोर; बारामती तालुक्यात विद्युतपंप चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

बारामती : न्यूज कट्टा    

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आणि सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत विहीरी आणि बोअरवरील विद्युतपंप चोरून नेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून ३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, रम्मी आणि व्यसनापायी या आरोपींनी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

ओंकार राजेश आरडे (वय २५, रा. लोणी भापकर), महेश दिलीप भापकर (वय ३१, रा. लोणी भापकर), अमोल लघु कदम (वय २८, रा. जळकेवाडी), नीलेश दत्तात्रय मदने (वय २८), प्रथमेश जालिंदर कांबळे (वय २२, रा. लोणी भापकर) आणि दिलीप कालिदास भोसले (वय ४२, रा. लोणी भापकर) अशी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर, सायंबाचीवाडी हद्दीत शेतकऱ्यांच्या विहीरीवरील व बोअरवरील विद्युतपंप चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. याबाबत पोलिस हवालदार तौफिक मनेरी आणि भाऊसाहेब मारकड हे तपास करत होते. या दरम्यान, स्थानिक तरुणांनीच या चोऱ्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ओंकार आरडे, महेश भापकर, अमोल कदम, नीलेश मदने आणि प्रथमेश कांबळे यांना ताब्यात घेत चौकशी केली.

या तरुणांनी चोरी केल्याचे कबूल करत चोरलेले साहित्य दिलीप भोसले याला विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर या टोळीने १७ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून १४ गुन्ह्यात चोरीला गेलेला ३ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, रम्मी आणि व्यसनापायी या तरुणांनी चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!