जेजुरी : न्यूज कट्टा
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर जेजूरीनजीक बेलसर फाटा येथे एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत एकाच वस्तीतील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे परिसरावर शोककळा पसरली आहे.
रमेश किसन मेमाणे (वय ६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय ४०) आणि पांडुरंग दामोदर मेमाणे (वय ६५) अशी या तिघांची नावे आहेत. तिघेही बोरमाळ वस्ती ,पारगाव मेमाणे ,ता पुरंदर जि पुणे येथील रहिवाशी आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सासवड-जेजुरी रस्त्यावर बेलसर फाट्यादरम्यान सध्या उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे तिघेही दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली.
एसटी चालकाने वेग कमी करून बस रस्त्याखाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बसखाली अडकल्यामुळे दुचाकी काही अंतर फरफटत केली. त्यामध्ये रमेश मेमाणे, संतोष मेमाणे आणि पांडुरंग मेमाणे या तिघांचाही मृत्यू झाला. या तिघांनाही जेजूरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, एकाच वस्तीत राहणाऱ्या मेमाणे भावकीतील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





