PHALTAN CRIME : फलटण तालुक्यात उडाली खळबळ; उसाच्या शेतात आढळला महिलेचा अर्धवट मृतदेह, अंधश्रद्धेतून हत्येचा अंदाज

फलटण : न्यूज कट्टा  

उसाच्या शेतात एका महिलेचा अर्धवट स्थितीतील मृतदेह आढळून आल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या मृतदेहाशेजारी उडीद, काळी बाहुली व दोन चाकू आणि मंतरलेला भातही आढळून आला आहे. त्यामुळं अंधश्रद्धेतून हा बळी दिल्याचा अंदाज वर्तवला जात असून या संपूर्ण प्रकाराचा उलगडा करण्याचं आव्हान फलटण तालुका पोलिसांसमोर उभे राहीले आहे.

फलटण तालुक्यातील विडणी येथे हा प्रकार घडला आहे. येथील शेतकरी प्रदीप जाधव हे काल सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह अर्धवट स्थितीत असून त्यांच्या बाजूलाच उडीद, काळी बाहुली व दोन चाकू आणि मंतरलेला भात अशा संदिग्ध गोष्टी आढळून आल्या. हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचं लक्षात आल्यानंतर प्रदीप जाधव यांनी तात्काळ पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानंतर फलटण तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी भेट दिली.

दहा ते पंधरा दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून केवळ कमरेखालील भाग सापडल्याने उर्वरीत भाग शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.

या घटनेनंतर जाधव यांच्या शेतातील उसाची तोडणी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी इतर अवयव सापडतात का याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, हा अंधश्रद्धेतून घडलेला प्रकार आहे की खून याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. अतिशय निर्घृण पद्धतीने या महिलेचा जीव घेण्यात आला आहे. त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवण्याबरोबरच आरोपींचा शोध घेणं हेही पोलिसांसमोरील दिव्य असणार आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!