बीड : न्यूज कट्टा
पोलिस भरतीसाठी पहाटे व्यायाम करायला गेलेल्या पाच युवकांना भरधाव वेगातील एसटी बसने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघेजण जखमी झाले आहेत. बीड-परळी रस्त्यावरील घोडका राजुरी फाट्याजवळ पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बालाजी बाबासाहेब मोरे, ओम सुग्रीव घोडके, आणि विराज बब्रूवान घोडके अशी या अपघातात मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीड-परळी महामार्गावर हा अपघात झाला. पहाटेच्या वेळी बीडमधून परभणीत एक एसटी बस जात होती. त्यावेळी बीड-परळी महामार्गावर घोडका राजुरी फाट्याजवळ पाच जण पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी गेले होते. यावेळी हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करत होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना धडक दिली.
एसटी बसच्या जोरदार धडकेमुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिमेंटच्या रस्त्यावरून बस खाली सरकल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर मृत युवकांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली. पोलिस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या या युवकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.





