बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे जिल्हा परिषदेने जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर केलेले काम नियोजित ठिकाणी न करता दुसऱ्याच ठिकाणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंता अक्षय नंदकूमार झारगड यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
वाघळवाडी येथे जन सुविधा योजनेअंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते. त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आलेली होती. मात्र हे काम प्रत्यक्ष मंजुरीच्या ठिकाणी न करता इतर ठिकाणी करण्यात आले. या कामाचे अंदाजपत्रक बनवण्यासाह संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता म्हणून अक्षय झारगड यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र त्यांनी प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी न घेताच परस्पर बदल करत हे काम करून घेतले.
ही बाब लक्षात आल्यानंतर बारामती पंचायत समितीच्या उपअभियंत्यांकडून अहवाल मागवण्यात आला होता. तसेच कार्यकारी अभियंत्यांकडून याबाबत चौकशी करण्यात आली होती. याबाबत ग्रामस्थांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अक्षय झारगड यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, अक्षय झारगड यांच्याबद्दल अनेक तक्रारी असल्याची बाबही आता समोर आली आहे.
दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागील पंधरा दिवसात दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर अनेक बांधकाम विभागात अनेकांची चौकशी सुरू असून त्याबाबत तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देशही गजानन पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून आता कारवाईला सुरुवात झाली आहे.





