पुणे : न्यूज कट्टा
पुणे शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचा धोका वाढत आहे. कालपर्यंत २४ जण या आजाराने त्रस्त होते. त्यानंतर आता रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून ही संख्या थेट ५९ वर पोहोचली आहे. यामध्ये ३८ पुरुष आणि २१ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या आजाराने ग्रासलेले १२ रुग्ण सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यात मागील काही दिवसात गुइलेन बॅरे सिन्ड्रोम या आजाराने थैमान घातले आहे. मागील आठवड्यात या आजाराचे २२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काल यात वाढ झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता ही संख्या दुप्पट झाली असून जवळपास ५९ जणांना या आजाराची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
पुणे शहरातील सिंहगड रस्ता, धायरी, किरकटवाडी आदी भागात या रुग्णांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने या परिसरातील पाण्याचे नमुने तपासायला सुरुवात केली आहे. या आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णांचे नमूनेही तपासले जात आहेत. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे पुणेकर धास्तावले आहेत. हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





