बारामती : न्यूज कट्टा
अल्पवयीन मुलांचा एकमेकांकडे बघण्यावरून सुरू झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर कोयत्याने वार केल्याची घटना बारामती तालुक्यातील पणदरे येथे शनिवारी घडली. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नीलेश रामदास जगदाळे (वय २१, रा. पणदरे) असं या घटनेत जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी दुपारच्या वेळी पणदरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या आवारात काही अल्पवयीन मुले भांडत असल्याचं नीलेश जगदाळे यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिल्यानंतर एकमेकांकडे बघण्यावरून गावातील अल्पवयीन मुलांचे भांडण सुरू असल्याचे समजले.
त्यांनी या मुलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना पणदरे येथील सुतगिरणी परिसरात भांडण मिटवण्यासाठी एकत्र जमवले. त्या ठिकाणी गेल्यानंतर या अल्पवयीन मुलांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. याचदरम्यान एक अल्पवयीन मुलगा कोयता घेऊन फिर्यादी नीलेश जगदाळे यांच्या अंगावर धावून आला आणि त्याने कोयत्याने जगदाळे यांच्या डोक्यावर वार केला. यात जगदाळे यांनी हा वार चुकवल्यानेतो त्यांच्या उजव्या खांद्यावर बसला. त्यानंतर अल्पवयीन मुलाकडून पुन्हा दूसरा वार झाला. त्यामध्ये जगदाळे यांच्या उजव्या हाताच्या कोपराला गंभीर जखम झाली.
याबाबत नीलेश जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९, ३५१(३), ११७ (४), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल न्यायालयाकडे करण्यात आली आहे. प्रकरणातील फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. माळेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे अधिक तपास करत आहेत.





