राजगड : न्यूज कट्टा
किल्ले राजगड येथे पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. अनिल विठ्ठल आवटे असं या युवकाचं नाव असून तो पोलिस भरतीची तयारी करत होता. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर त्याचं पोलिस खात्यात काम करण्याचं स्वप्न भंगलं आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये अनिल आवटे (रा. धायरी, पुणे, मूळ रा. भाबट, ता. सेलू, जि. परभणी) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, धायरी येथील पोलिस भरती अकॅडमीमधील प्रशिक्षणार्थी रविवारी किल्ले राजगड येथे ट्रेकिंगसाठी आले होते. पाली दरवाजानजीक बुरुजावरील दगड अनिलच्या डोक्यामध्ये पडला. यामध्ये अनिल गंभीररित्या जखमी झाला.त्यानंतर अनिलच्या मित्रांनी त्याला गडावरुन खाली आणत येथील वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचारांपूर्वीच अनिलचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दगड पडल्यामुळे अनिलच्या डोक्याला जबर जखम झाली होती. तसेच त्याच्या कानातूनही मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळं अनिलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी सांगितलं. अनिल हा मूळचा परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याची पोलिस खात्यात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळं तो धायरीत चुलत्यांकडे राहून पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. मात्र राजगड किल्ल्यावर फिरायला गेल्यानंतर डोक्यात दगड पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळं पोलिस खात्यात काम करण्याचं त्याचं स्वप्न भंगलं आहे. या प्रकरणी अधिक तपास वेल्हे वेल्हे पोलीस करत आहेत.





