मुंबई : न्यूज कट्टा
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. या आरोपींना पानसरे यांच्या हत्येप्रकरणी २०१८-१९ या काळात अटक करण्यात आली होती. या खटल्याचा निकाल लवकर लागण्याची शक्यता नाही, तसेच आरोपी अटकेपासून तुरुंगातच असल्यामुळे जामीन मंजूर केल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं.
सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी अशी उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. १६ फेब्रुवारी २०१५ रोही कॉम्रेड गोविंद पानसरे यांची त्यांच्या कोल्हापूर येथील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास करण्यात महाराष्ट्रातील तपास यंत्रणा अपयशी ठरली होती. मात्र पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणानंतर पानसरे हत्या प्रकरणाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले.
पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा सीआयडीकडून तपास करण्यात आला. न्यायालयात याबाबतचा खटला सुरू असून अद्यापही निकाल प्रलंबित आहे. २०१८-१९ पासून आरोपी तुरुंगात आहेत. त्यातच हा खटला लवकर निकाली निघण्याची शक्यता नसून तपास यंत्रणेलाही या खटल्यात यश आलेले नाही. त्यामुळे या आरोपींना जामीन मंजूर करण्यात येत असल्याचं उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं.





