नाशिक : न्यूज कट्टा
रील बनवताना अडथळा आणल्यानं एका युवकावर दोघांनी कोयत्यानं वार केल्याचा प्रकार घडला आहे. नाशिक शहरातील चुंचाळे येथील म्हाडा कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेत संबंधित युवक जखमी झाला असून या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पू जयमंगल गौड (रा. दत्तनगर, अंबड) असं या घटनेत जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे. तर त्याच्यावर कोयत्यानं हल्ला केल्याप्रकरणी सोनू सोळसे आणि साई संतोष तुपसूंदर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पप्पू गौड हा युवक रविवारी दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री आपल्या भावांसह म्हाडा कॉलनीत भाडे तत्वावरील घराचा शोध घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी सोनू सोळसे आणि साई तूपसुंदर हे भररस्त्यात हातात कोयता घेऊन रील बनवत होते.
मोबाईलमध्ये शूट घेत असताना पप्पू गौड हा मधून गेला. त्यातूनच रीलमध्ये अडथळा आल्यानं सोनू सोळसे आणि साई तूपसुंदर या दोघांनी या तिघा भावंडांना शिवीगाळ करत पप्पू गौड याच्या पाठीवर कोयत्याने वार केले. त्यामध्ये पप्पू हा गंभीररित्या जखमी झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





