फलटण : न्यूज कट्टा
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने बुधवारी पहाटे धाड टाकली. कालपासून आयकर विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आज या धाडीला ३६ तास उलटल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरूच आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘सरोज व्हिला’ या बंगल्यावर काल पहाटे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड घेतली. तपास यंत्रणेकडून कालपासून श्रीमंत संजीवराजे यांच्याशी संबंधित कंपन्या आणि इतर बाबींची माहिती घेतली जात आहे. आजही आयकर विभागाचे अधिकारी याबाबत चौकशी करत आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी गोविंद मिल्क या दूध प्रकल्पाच्या अनुषंगाने चौकशी केली जात असल्याचे बोलले जात आहे.
काल सकाळी ही धाड पडल्यानंतर बंगल्याच्या परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. आजदेखील कार्यकर्त्यांनी बंगल्याच्या परिसरात ठिय्या मांडला आहे. सोशल मिडियातून याबाबत तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात असून या धाडीमागे राजकारण असल्याचं बोललं जात आहे. एकूणच या धाडीमुळे फलटण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, श्रीमंत संजीवराजे यांनी विधानसभा निवडणुकीत अजितदादांची साथ सोडत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. माजी आमदार दीपक चव्हाण यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळवून देत त्यांनी जोरदार प्रचारही केला होता. मात्र या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून श्रीमंत संजीवराजे हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात घरवापसी करतील, अशी चर्चा होती. अशातच ही धाड पडल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.





