बारामती : न्यूज कट्टा
आपल्या मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या पालकाच्या दुचाकीला बारामती नगरपरिषदेच्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनाने ठोस देत दुचाकी फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या वाहनावर असणारा एनडीके कंपनीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसातील ही दुसरी घटना असून एनडीके कंपनीचे लाड कोण करतंय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास योगेश नाळे हे आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी तीनहत्तीचौकाजवळ बारामती नगरपरिषदेच्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनाने योगेश नाळे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये नाळे यांची मुलगी खाली पडली. मात्र वाहनचालकाने योगेश नाळे यांना काही अंतरापर्यंत दुचाकीसह फरफटत नेले.
या घटनेनंतर नाळे यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना या प्रकाराची कल्पना दिली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी घटनास्थळी येण्याची तसदी घेतली नाही अशी माहिती योगेश नाळे यांनी दिली. नगरपरिषदेच्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनावरील चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशीही माहिती आता समोर येवू लागली आहे. या घटनेनंतर पालकांमधून तसेच नागरीकांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मागील महिन्यातच याच एनडीके कंपनीच्या मद्यधुंद चालकाने माजी उपानगराध्यक्षा ज्योती बल्लाळ यांच्यासह काही महिलांना उडवले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जुजबी पोलिस कारवाई करून संबंधितांना मोकळीक मिळाली. वास्तविक या एनडीके नामक कंपनीच्या ठेकेदारावर बारामती नगरपरिषदेने ठोस कारवाई करणे गरजेचे होते. मात्र नगरपरिषदेचे अधिकारीच या कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेतात याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
अधिकारीच ठेकेदाराला घालतात पाठीशी
बारामतीत मागील काही दिवसांत एनडीके कंपनीची मुजोरी वाढत असताना प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. बारामती नगरपरिषदेतील अधिकाऱ्याचे या कंपनीबरोबर हितसंबंध आहेत. त्यामुळे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कितीही मुजोरी केली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही असंही आता बोललं जात आहे.
तो अधिकारी कोण..?
प्रशासनाने अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे एनडीके कंपनीचा तारणहार असलेला हा अधिकारी कोण याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपल्या वाहनाने एका दुचाकीस्वाराला धक्का दिल्यानंतर त्याला काय झाले न पाहता त्याला थेट दुचाकीसह फरफटत नेण्याची मुजोरी करणाऱ्या या कंपनीवर कारवाई कधी होणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे.





