BARAMATI BREAKING : एनडीके कंपनीच्या चालकावर गुन्हा दाखल; ठेकेदाराला मात्र मोकळीक, बारामती नगरपरिषद प्रशासनाची भूमिका काय..?

बारामती : न्यूज कट्टा

मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या पालकाच्या दुचाकीला धडक देणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनावरील चालकावर बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र एनडीके कंपनीच्या संचालकावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता बारामती नगरपरिषद प्रशासन वारंवार अपघातास कारणीभूत ठरलेल्या एनडीके कंपनीबाबत काय भूमिका घेणार असा सवाल उपस्थित होत आहे.

बारामती शहरातील तीन हत्ती चौकात काल आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघालेल्या योगेश नाळे यांच्या दुचाकीला बारामती नगरपरिषदेच्या कचरा संकलनाचे काम करणाऱ्या एनडीके कंपनीच्या मद्यधुंद चालकाने धडक दिली होती. यामध्ये नाळे यांची मुलगी रसिका ही दुचाकीवरून पडली. तसेच योगेश नाळे यांनाही दुखापत झाली. विशेष म्हणजे हा अपघात झाल्यानंतर या चालकाने वाहन न थांबवता नाळे यांच्यासह त्यांची दुचाकी फरफटत नेली होती.

या प्रकरणी योगेश नाळे यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना संपर्क साधला. मात्र ते  घटनास्थळी आलेच नाहीत असाही आरोप योगेश नाळे यांनी केला होता. त्यानंतर योगेश नाळे यांनी या प्रकाराबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एनडीके कंपनीचा चालक विकास सुनील ससाणे (वय ३१, रा. जळोची, मूळ रा. घुगल वडगाव,ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), वाहन कायदा १८१, १८४,१८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मागील महिन्याभरात एनडीके कंपनीच्या वाहनाकडून दूसरा अपघात घडला आहे. मात्र अद्याप संबंधित कंपनीच्या संचालकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे या कंपनीबाबत अनेक तक्रारी असतानाही बारामती नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तरी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे हे याबाबत ठोस पावले उचलतील का असा सवाल उपस्थित होत आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!