माळेगाव : न्यूज कट्टा
भरधाव डंपरने धडक दिल्याने रस्त्याने पायी चाललेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी डंपर चालकावर माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर चालकाने डंपरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी पाठलाग त्याला पकडले.
रामदास जयवंत ताम्हाणे ( वय ६५, रा.जळगाव क.प. ता.बारामती) असं या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी उमेश लक्ष्मण ताम्हाणे यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार डंपर चालक हिरामण श्रावण बाबर (रा. आदर्श नगर, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामदास ताम्हाणे हे काल दुपारच्या वेळी बारामती-मोरगाव रस्त्याने पायी चालत निघाले होते. त्यावेळी मोरगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने (एमएच ४२ टी ०३२९) त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात रामदास ताम्हाणे यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी उमेश ताम्हाणे यांच्यासमोरच ही घटना घडली. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात हिरामण बाबर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार प्रविण वायसे करीत आहेत. दरम्यान, या अपघातानंतर डंपरचालक डंपरसह पळून जात होता. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करत कऱ्हावागज येथे त्याला पकडले.





