सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा
आपल्या नेत्यांकडून आपल्याला एखाद्या पदावर संधी देऊन आपल्या कामाची पावती द्यावी अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. अनेकदा ही संधी मिळते तर काहीवेळा नाराजीही पत्करावी लागते. मात्र काल सोमेश्वर कारखान्याच्या संचालकपदी मिलिंद बळवंत कांबळे या सामान्य कार्यकर्त्याची निवड झाली अन् त्यानं अजितदादांचे आभार मानत अश्रूंना वाट मोकळी करून दिल्याचा प्रसंग पाहायला मिळाला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण कांबळे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी काल सोमेश्वर कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुक्यातील होळ येथील मिलिंद कांबळे या सामान्य कार्यकर्त्याची सोमेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड करण्यात आली.
सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीचे सोपस्कार पार पडले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते. या निवडीची घोषणा होताच मिलिंद कांबळे यांना अश्रु अनावर झाले. अजितदादांचे आभार मानत मिलिंद कांबळे हे अक्षरश: ढसाढसा रडले.
मिलिंद कांबळे हे गेल्या अनेक काळापासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. त्यांनी सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतही उमेदवारी मागितली होती. मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. मात्र कारखान्याच्या एका संचालकाने राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार मिलिंद कांबळे यांना रिक्त जागेवर संधी मिळाली आहे.





