पुणे : न्यूज कट्टा
पिंपरी चिंचवड परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीनं १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. प्रेम संबंधातून वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून या युवतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. या युवतीनं आत्महत्येपूर्वी एका मैत्रिणीला पाठवलेल्या व्हाईस नोटमुळे आत्महत्येचं कारण समोर आलं असून तिला छळणाऱ्या युवकाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सहिती कलुगोटाला रेड्डी (वय २०, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असं आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी प्रणव राजेंद्र डोंगरे (वय २०, रा. आकुर्डी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, सहिती ही इंजिनियरींगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिनं १५ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र आता या आत्महत्येमागील धक्कादायक कारण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
प्रणव डोंगरे आणि सहिती यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. या प्रेमाचा गैरफायदा घेत प्रणव सहितीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. त्यातूनच तिनं ५ जानेवारी रोजी इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारत स्वत:चं जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी तिनं आपल्या एका मैत्रिणीला मेसेज पाठवत तिच्या मोबाईलचा पासवर्ड, काही मित्रांचे नंबर पाठवले होते.
संबंधित मैत्रिणीने याबाबत सहितीच्या आई-वडिलांना माहिती दिली. त्यांनी सहितीचा मोबाईल अनलॉक केल्यानंतर त्यामध्ये प्रणव याच्यासह आई-वडील आणि मित्रमैत्रिणींसाठी व्हाईस नोट सेव्ह करून ठेवली होती. त्यामध्ये तिनं प्रणवच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय ५४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाकड पोलिस करत आहेत.





