BARAMATI BREAKING : तीन आठवडे जीबीएसशी लढा, पण तिचा निभाव लागला नाही; पुण्यात शिक्षणासाठी गेलेल्या बारामतीच्या तरुणीचा जीबीएसनं घेतला बळी

बारामती : न्यूज कट्टा

पुण्यात सिंहगड रोड परिसरात शिक्षणासाठी गेलेल्या बारामतीच्या तरुणीचा जीबीएस सिन्ड्रोम या आजाराने मंगळवारी मृत्यू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ही तरुणीची या आजाराशी झुंज सुरू होती. मात्र जीबीएसपुढे तिचा निभाव लागला नाही. या घटनेनंतर बारामती व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

किरण राजेंद्र देशमुख (वय २१) असं या तरुणीचं नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रोड परिसरात शिक्षणासाठी वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी तिला जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळं तिला बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी तिला पुण्यात उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. पुण्यात तपासणी केल्यानंतर तिला जीबीएस सिन्ड्रोम या आजाराने ग्रासल्याचं निष्पन्न झालं. गेल्या तीन आठवड्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यू झाला.

किरणचे वडील हे रिक्षाचालक आहेत. किरणच्या आजारपणाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देण्यात आली. त्यांनी देशमुख कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत किरणला पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार तिच्यावर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या तीन आठवड्यांपासून तिचा जीबीएस या आजाराशी संघर्ष सुरू होता. मात्र मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, सिंहगड रोड परिसरात असताना तिनं पाणीपुरी खाल्ली होती. त्यानंतरच तिला जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. पुण्यात उपचार सुरू असताना दिवसेंदिवस तिची प्रकृती खालवत गेली. यातच तिचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप, सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली. बारामतीत अद्यापपर्यंत जीबीएसचा एकही रुग्ण आढळला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!