बारामती : न्यूज कट्टा
जिममध्ये झालेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि काही दिवस जाताच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका महिलेने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून २ लाख ८१ हजार रुपये रोख आणि १ लाख ६८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र उकळल्याची घटना बारामतीत घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी बीएनएस ३०८ (२), ३०८ (३),३५१(२),३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, संबंधित फिर्यादी हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत असून ते माळेगाव येथील एका जिममध्ये नियमीत व्यायामासाठी जात असत. या दरम्यान त्यांची या महिलेशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघेही पुणे, महाबळेश्वर, उज्जैन, तिरूपती येथे फिरण्यासाठी गेले.
या दरम्यान, दोघांमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले. त्यावेळी या महिलेने या दोघांचेही खासगी फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये काढून घेतले होते. काही काळ गेल्यानंतर या महिलेने संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वेळोवेळी तिच्याकडून पैशांची मागणी होऊ लागल्याने फिर्यादीने तिला ऑगस्ट २०२४ मध्ये १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे डायमंडचे मंगळसूत्र खरेदी करून दिले. त्यानंतरही ही महिला फिर्यादीला ब्लॅकमेल करत असल्यानं त्यानं वेळोवेळी फोन पे व अन्य ऑनलाईन अॅपद्वारे २ लाख ८१ हजार ६०० रुपये दिले.
दरम्यानच्या काळात या महिलेने फिर्यादीच्या घरी जाऊन वाद घातला. मी सांगितली तेवढी रक्कम मला दिली नाहीस तर मी बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी ही महिला देत होती. तिने अनेकांना याच पद्धतीने ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याची माहिती फिर्यादीला मिळाली. त्यानंतर फिर्यादीने बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मूळची आझादपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील आणि सध्या बारामती शहरालगत असलेल्या मळद येथे वास्तव्यास असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.





