BIG NEWS : बारामती तालुक्याच्या जिरायत भागाला संजीवनी मिळणार; निरा-कऱ्हा उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण होणार, अजितदादांकडून शब्दपूर्ती

बारामती : न्यूज कट्टा   

विधानसभा निवडणूक काळात बारामती तालुक्याच्या जिरायत भागाची ‘जिरायत’ ही ओळख कायमस्वरूपी बदलण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त नलिकांसाठी ४३८ कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर आता अजितदादांनी निरा-कऱ्हा उपसा सिंचन योजनेचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल आणि अन्य प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी अजितदादांनी बारामतीच्या जिरायत भागाची ओळख कायमस्वरूपी पुसून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यावर आपला भर असेल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सिंचनासाठी जानाई-शिरसाई योजनेच्या बंदिस्त नालिकेसाठी ४३८ कोटी ४७ लाख रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली. यातून या तीनही तालुक्यातील १४ हजार ८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

दुसरीकडे निरा-कऱ्हा उपसा सिंचन योजनेचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल आणि इतर आनुषंगिक कामांसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २९ लाख ६४ हजार रुपयांची ही निविदा असून त्यातून ही कामे मार्गी लावून पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. या योजनेतून बारामती तालुक्यातील मोरगावपासून अंजनगावपर्यंतच्या व परिसरातल्या गावांना पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या दोन्ही योजनांच्या माध्यमातून बारामती तालुक्याच्या जिरायत भागाला संजीवनी मिळणार आहे. अजितदादांनी या दोन्ही योजनांच्या कामांसाठी विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे अजितदादांनी शब्द दिल्याप्रमाणे बारामती तालुक्याच्या जिरायत भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून जिरायत ही ओळख पुसली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!