मुंबई : न्यूज कट्टा
राज्याचे क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नविन जबाबदारी दिली आहे. त्यांच्याकडे आता वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडल्यानंतर दत्तात्रय भरणे यांच्याकडे या जिल्ह्याची सुत्रे देण्यात आली आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडलं होतं. त्यानंतर या जिल्ह्यात पालकमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी दत्तात्रय भरणे यांचं नाव निश्चित केलं. त्यानुसार राज्य शासनाकडून याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहे.
दत्तात्रय भरणे यांनी सलग तीनवेळा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. यापूर्वी त्यांना सोलापूरच्या पालकमंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर आता वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा भरणे यांच्याकडे आली आहे.





