बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
युवा उद्योजक म्हणून मिरवत असलेल्या बारामतीच्या लखोबा लोखंडेचे अनेक किस्से आता समोर येवू लागले आहेत. कमी काळात चांगलीच मलई मिळाल्यानं या पठ्ठ्यानं थेट स्वत:चं हेलिकॉप्टरच खरेदी करण्याचा प्लॅन केला होता अशीही माहिती समोर येवू लागली आहे. एवढंच नाही तर या लखोबाने अनेक अधिकाऱ्यांनाही आपल्या जाळ्यात घेरल्याचं पुढे येत आहे. त्याच्या या बोलबच्चनला अनेक अधिकारी बळी पडल्याची माहितीही समोर येत आहे.
बारामतीपासून जवळच्या तालुक्यातील नेत्यांचा खंदा समर्थक आणि युवा उद्योजक म्हणून मिरवणाऱ्या बारामतीतील लखोबा लोखंडे याचे अनेक उद्योग आता समोर येत आहेत. एका डेअरी व्यवसायातील कंपनीची तब्बल 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला असतानाच या लखोबाने कमी वेळात भरपूर पैसा मिळवण्यासाठी या लखोबाने वेगवेगळ्या युक्त्या वापरल्याचंही समोर येत आहे.
त्यानं आपलं नेटवर्क वापरत आणि नेत्यांची जवळीक दाखवत मिळेल तिथे हात मारण्याचा उद्योग चालवला होता. संबंधित नेत्याकडे फक्त आपलंच चालतं अशी बतावणी करत समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यावर हा लखोबा भर देत होता. अशाच पद्धतीने त्याने अनेक अधिकारी आणि उद्योजकांना जाळ्यात ओढत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच त्यानं मोठ्या प्रमाणात माया जमवल्याची चर्चा आहे.
कडक कपडे, ब्रॅंडेड मोबाईल, घड्याळ आणि तितकीच अलिशान कार वापरत हा लखोबा समोरच्यावर छाप पाडत होता. मात्र जवळ आलेला पैसा आणि अलिशान गाड्यांची हौस पूर्ण झाल्यामुळे या पठ्ठ्यानं थेट स्वत:च्या मालकीचं हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्लॅन केला होता अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे नवं कोरं चॉपर माझ्याकडेच असायला पाहिजेल असा लखोबाचा मानस होता.
एकूणच गेल्या काही काळात या लखोबाने वेगवेगळ्या भागात आपली खास स्टाईल वापरत अनेक व्यवहार केले. त्यातील काही पूर्ण केले असले तरी काही मोठ्या रकमांचे व्यवहार अपूर्ण राहिल्यामुळे ते पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेपर्यंत पोहोचले आहेत. त्यातूनच या लखोबाच्या उद्योगांची चर्चा मोठ्या प्रमाणात झडू लागली आहे.





