बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा
एका डेअरी कंपनीला १० कोटी रुपयांना गंडवणाऱ्या या लखोबा अर्थात आनंद लोखंडेसह त्याच्या तथाकथित कंपनीतील संचालकांची मुंबईसह विविध ठिकाणच्या पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र येणाऱ्या काळात या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या लखोबाची आणि त्याच्या साथीदारांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
बारामतीतील आनंद सतीश लोखंडे हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अर्थात लखोबा लोखंडे आहे. त्याने विद्या सतीश लोखंडे आणि प्रीती निंबाळकर यांच्यासह अन्य लोकांना सोबत घेऊन अनेकांना टोप्या टाकल्या आहेत. बारामतीजवळील एका मतदारसंघातील नेत्यांचा समर्थक म्हणून मिरवणाऱ्या या लखोबा लोखंडेचा पर्दाफाश सर्वात आधी ‘न्यूज कट्टा’ ने केला आहे. त्यानंतर त्याने केलेल्या फसवणुकीचे अनेक किस्से समोर येवू लागले आहेत.
मुंबईतील बारामती डेअरी कंपनीला या लखोबाने तब्बल १० कोटी रुपयांना गंडवले आहे. एका आठवड्यात रक्कम देण्याचं आश्वासन देऊन तब्बल २ कोटी रुपयांचं लोणी खरेदी केलं. त्यानंतर या कंपनीकडून दूध पुरवठ्यासाठी म्हणून तब्बल ९३ लाख रुपये घेतले. दूध व्यावसायिकांना अतिरिक्त फायदा देण्यासाठी म्हणून ६ कोटी ४३ लाख रुपयांची बनावट बिले सादर केली. प्रत्यक्षात ही रक्कम कंपनीला मिळालीच नाही.
दूध पावडर पुरवतो असं सांगून या कंपनीशी संबंधित अन्य कंपनीकडून ३२ लाख रुपये उकळले. याबाबत संबंधित लखोबाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यानं संबंधितांना रक्कम अदा केली नाही. या लखोबाने संबंधितांना धनादेश दिले. मात्र ते वटलेच नाहीत. त्यामुळे या कंपनीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित लखोबासह त्याच्या कंपनीशी संबंधितांची चौकशी करून जबाबही घेतले आहेत.
कोण आहे लखोबा लोखंडे..?
या लखोबाने केवळ एकाच कंपनीची फसवणूक केलेली नाही. तर त्यानं अनेकांना गंडा घातला आहे. बारामती तालुक्यातील खताळपट्टा येथील मूळचा रहिवासी असलेला आनंद लोखंडे हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. त्यानं एका नेत्याची जवळीक सांगत मोठ्या प्रमाणात माया कमवल्याचे आता समोर येवू लागले आहे. त्याने विद्यानंद फाउंडेशन, विद्यानंद अॅग्रो फूडस, विद्यानंद डेअरी प्रा. लि. अशा विविध फर्म स्थापन करत त्या माध्यमातून फसवणूक केली आहे.
विशेष म्हणजे बारामतीसह परिसरातील विविध प्रकल्पांमधून पशूखाद्य खरेदी करून तो विविध ठिकाणी विक्री करत होता. त्यानंतर मात्र त्याने अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी अनेक कंपन्यांची तसेच उद्योजकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. या लखोबाने अनेक अधिकाऱ्यांनाही आपण संबंधित नेत्यांचं सर्व कामकाज पाहतो अशी बतावणी करत गंडा घातला आहे. न्यूज कट्टाने या लखोबाचा पर्दाफाश केल्यानंतर त्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.





