बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर बारामती पोलिसांनी पावले उचलली आहेत. या प्रकरणी लासुर्णे परिसरातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आदेश हर्षवर्धन लोंढे, मयूर अंकुश गायकवाड आणि आदित्य विकास लोंढे (तिघेही रा. लासुर्णे, ता. इंदापूर) अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, हेमंत भिसे हा युवक बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या सागर टी पॉईंट या हॉटेलमध्ये काम करत होता. त्यावेळी अचानक तिघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी थेट हेमंत याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण करत त्यांनी हेमंतला रस्त्यापर्यंत आणले. त्याही ठिकाणी त्याला बेदम मारहाण करत घटनास्थळावरून तिघे निघून गेले. त्यानंतर हेमंतला बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी पावले उचलत आरोपीची ओळख पटवत तिघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी हेमंतचा भाऊ दीपक रतीलाल भिसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर बारामतीत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.





