बारामती : न्यूज कट्टा
शुक्रवारी बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एका टी सेंटरमधील युवकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती दौऱ्यावर असताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. माझ्या जवळचा कार्यकर्ता असला तरी पोलिसांनी तात्काळ अशा लोकांचा बंदोबस्त करावा अशा सूचना देतानाच मी अशा गोष्टी खपवून घेणार नाही असाही इशारा अजितदादांनी दिला आहे.
बारामतीत शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात एका युवकाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी बेदम मारहाण केली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओही सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती दौऱ्यावर असताना या घटनेवर भाष्य करत पोलिस यंत्रणेला सूचना केल्या आहेत.
एखाद्यानं कुत्र्याला मारलं तर आपण मुक्या प्राण्याला कशाला मारतो अशी विचारणा करतो. पण परवा बारामतीत एकाला मरूस्तोवर मारलं. त्याला लाथा मारत होते.. फुटबॉल खेळतात तसं त्याला मारलं जात होतं.. त्याची क्लिप तुम्हीही पाहिली असेल. तेव्हा मी पोलिसांना सांगितलं की माझ्या जवळचा कार्यकर्ता असला तरी आणि त्यांच्या मुलांनी जरी असले उद्योग केले तरी त्यांचा बंदोबस्त हा झालाच पाहिजे असं या घटनेबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केलं.
पुढे बोलताना अजितदादांनी मी अशा गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही असाही इशारा दिला. कोणी असे उद्योग करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. वेळ पडली तर मोक्का लावयालाही मागेपुढे पाहू नका अशी सुचनाच त्यांनी यावेळी केली. तसेच कुणीही कायदा हातात घेऊ नका असे आवाहन करत अजितदादा म्हणाले, तुम्हाला काही त्रास झाला तर थेट पोलिसांकडे तक्रार करा. पण काहीजण कुणालाही ठोकून काढतात, बदडतात या गोष्टी होता कामा नयेत.
आपली मुलं मुली काय करतात, कुठे चुकतात हे पाहणं पालकांची जबाबदारी आहे. ती पालकांनी पार पाडली पाहिजे याची नोंद घ्या. काहीजण मला फोन करतात, दादा.. चुकलं, आता पोटात घ्या. आरं पार पोट फुटायला लागलंय अन् काय सांगता पोटात घ्या..? सांगणाऱ्याला लाजलज्जा शरमही वाटत नाही, असंही अजितदादांनी यावेळी सांगितलं.





