BIG BREAKING : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची घरवापसी होणार..? चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनं चर्चेला उधाण; हर्षवर्धन पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय काय..?

मुंबई : न्यूज कट्टा 

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधातील नेत्यांना अजितदादांकडून ताकद मिळते हेही सर्वज्ञात आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी सलग तीनवेळा म्हणजेच २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर लढवल्या. मात्र या तीनही निवडणुकांमध्ये अजितदादांचे कट्टर समर्थक असलेल्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.

अजितदादांनी राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडत भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला पुन्हा संधी या सूत्रानुसार विधानसभा निवडणुकीत जागा वाटप करण्यात आलं. त्यामुळं विधानसभा लढवण्यास तीव्र इच्छुक असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी सरतेशेवटी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र याही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवताच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनीही त्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याने चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत असून त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, माझ्या तालुक्यातील महसूल विभागाशी संबंधित सुनावणीसाठी मी उपस्थित राहिलो होतो. याबाबत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिले आहेत. काही वेळापूर्वीच मी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. सत्तेतील मंत्र्यांकडे जनतेची कामे घेऊन जावे लागते. त्यामुळे यातून वेगळा अर्थ लावण्याचं काही कारण नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!