बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील काही रिक्षाचालक प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तसेच गैरवर्तनाच्या तक्रारी मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरातील विविध प्रमुख चौकांत विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली. यामध्ये जवळपास आठजणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
बारामती वाहतूक पोलिसांकडून बारामती शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय महिला रुग्णालय, सिटी इन चौक, श्रीराम नगर चौक, तीन हत्ती चौक, भिगवण चौक व बारामती बसस्थानक परिसरातील एकूण ७० रिक्षांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना, विमा (इन्शुरन्स), वाहनाची फिटनेस स्थिती, चालकांचे गणवेश आणि इतर नियमांचे पालन होत असल्याबाबत माहिती घेण्यात आली. या तपासणीदरम्यान आठ रिक्षाचालकांवर कारवाई करत एकूण ७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे, एका रिक्षाचालकाला गुटखा खाऊन वाहन चालवत असल्याबद्दल २०० रुपयांचा दंड करण्यात आला.
चालकाने परवाना, इन्शुरन्स आणि फिटनेस प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक आहे. शिवाय, गणवेशातच रिक्षा चालवणे आणि प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागावे तसेच कोणताही रिक्षाचालक प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. दरम्यान, यापूर्वी सिटी इन चौकात एका महिलेशी अपमानास्पद वर्तन केल्याच्या तक्रारीवरून एका रिक्षाचालकावर कारवाई करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने केली. या पथकात वाहतूक पोलिस सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण, महिला पोलिस कर्मचारी सीमा घुले, स्वाती काजळे, रेशमा काळे, रूपाली जमदाडे, माया निगडे, सीमा साबळे आणि शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी होते.
रिक्षाचालकांच्या गैरवर्तनाबाबत तक्रार करा!
काही रिक्षाचालक प्रवाशांशी गैरवर्तन करतात, अतिरिक्त भाडे आकारतात. अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी ९९२३६ ३०६५२ या क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.





