BARAMATI CRIME : लग्नासाठी जबरदस्ती अन् आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी; सततच्या धमक्यांना कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या, बारामती तालुक्यातील घटना

वडगाव निंबाळकर : न्यूज कट्टा 

तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचं मुंडकं उडवीन अशी धमकी देत सतत पाठलाग करून छेड काढण्याच्या प्रकाराला कंटाळून एका दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थीनीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे ही घटना घडली असून गावातील चौघांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल दत्तात्रय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे आणि सुनील हनुमंत खोमणे अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पिडीत मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. याबाबत माहिती अशी की,  येथील विशाल गावडे हा आपल्या साथीदारांसह संबंधित पिडीत मुलीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. वेळोवेळी तिला धमक्या देण्याबरोबरच शस्त्राचा धाक दाखवला जात होता.

या दरम्यान, या आरोपींनी तिचा पाठलाग करत माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या आईवडिलांना खल्लास करून टाकीन अशी धमकी दिली होती. दि. ७ एप्रिल रोजी या आरोपींनी गावच्या यात्रेआधी माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या आई वडिलांचं मुंडकं उडवीन असं धमकावलं होतं. त्यातूनच पिडीत मुलगी मानसिक तणावात होती. आपल्यामुळे आईवडिलांच्या जीवाचं बरं वाईट होईल ही चिंता तिला भेडसावत होती.

आरोपींकडून वारंवार येणाऱ्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात चौघांवर भारतीय न्यायसंहिता कलम १०७,७८,२९६,३५२, ३५१ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!