श्रीगोंदा : न्यूज कट्टा
गावाच्या यात्रेनिमित्त घराची स्वच्छता करताना वीजेचा धक्का बसल्यानं मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथे आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ऐन यात्रेच्या दिवशीच घडलेल्या या घटनेनं चांडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजेंद्र हिरामण लोंढे (वय ४९) आणि आई सखूबाई हिरामण लोंढे (वय ६५) असं या घटनेत मृत पावलेल्या मायलेकाचं नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चांडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा आज पार पडत आहे. या निमित्तानं राजेंद्र लोंढे आणि त्यांच्या आई पाण्यानं स्वच्छ करत होते. घराच्या मुख्य लोखंडी दरवाजापासून एक वायर जोडण्यात आली होती.
ही वायर घासून खराब झाल्यानं वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. त्याचवेळी राजेंद्र लोंढे यांना वीजेचा धक्का बसला. त्यावेळी राजेंद्र यांनी आपल्या आईला आवाज दिला. मुलाचा आवाज ऐकताच आई सखूबाई तात्काळ राजेंद्र यांच्याजवळ गेल्या. त्यावेळी त्यांनाही वीजेचा धक्का बसला. त्यातच या दोघांचाही मृत्यू झाला. राजेंद्र यांचे बंधू घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दारम्या, या घटनेनंतर चांडगाव गावावर शोककळा पसरली आहे. ऐन यात्रेच्या दिवशी पाहुणेरावळे येणार म्हणून तयारी करत असलेल्या मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





