बोपदेव अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या; सहा महिन्यांपासून आरोपी देत होता गुंगारा

इंदापूर : न्यूज कट्टा

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बोपदेव घाटातील महाविद्यालयीन तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात फरार असलेला आरोपी सूरज उर्फ बापू गोसावी (रा. भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. शनिवारी दुपारी अकलूज येथील एसटी स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, काल रात्री उशीरा या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांकडे देण्यात आला आहे.

३ ऑक्टोबर २०२४ रोजी बोपदेव घाटातील टेबल पॉईंट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करून तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी रवींद्रकुमार कनोजिया आणि अख्तर अली शेख या दोघांना अटक करण्यात आली होती. तिसरा आरोपी सूरज उर्फ बापू गोसावी हा या घटनेनंतर फरार झाला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी ६० पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला होता. या घटनेप्रकरणी जवळपास ४५० सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली होती. अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली होती. त्यातच रवींद्र कनोजिया आणि अख्तर शेख या दोघांना अटक करण्यात यश आले होते. मात्र तिसरा आरोपी सुरज गोसावी हा घटनेनंतर फरार झाला होता.

गोसावी हा वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून राहत होता. त्यानं आपल्या परिचितांशी संपर्कात राहणं बंद केलं होतं. त्यामुळं या आरोपीचा शोध घेणं पोलिसांना त्रासदायक ठरत होतं. या दरम्यान, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना हा आरोपी अकलूज येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!