इंदापूर : न्यूज कट्टा
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या करून मृतदेह तब्बल तीनशे किलोमीटर दूर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील डोंगरात सुमारे दीडशे फूट खोल दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद देणारा पतीच या प्रकरणातील आरोपी असल्याचं तीन महिन्यांच्या पोलिस तपासानंतर निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी महिलेचा पती जोतीराम आबा करे (रा. कळाशी, ता. इंदापूर) आणि त्याचा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे (रा. गोलांडेवस्ती, इंदापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा विवाह २०१३ साली कळाशी येथील ज्योतीराम करे याच्याशी झाला होता. त्यांना दोन अपत्यं आहेत.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पती ज्योतीराम याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. सततचे वाद आणि कुरबुरी यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला होता. या दरम्यान, २९ जानेवारी २०२५ रोजी ज्योतीराम करे याने इंदापूर पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या विवाहितेचा शोध सुरू असताना प्रियंका केवळ बेपत्ता झाली नसून तिचा खून झाला असावा असा संशय पोलिसांना आला. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू करत पती ज्योतीराम याच्यावर पाळत ठेवली. त्याच्यावरील संशय बळावल्यानंतर पोलिसांनी ज्योतीरामची उलटतपासणी केली. त्यावेळी त्याने आपणच चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केल्याचं आणि तिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यात दरीत टाकून दिल्याची कबुली दिली.
ज्योतीरामने दिलेल्या जबाबानुसार दि. २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास त्यानं आपला मित्र दत्तात्रय गोलांडे याच्यासोबत कळाशी येथील राहत्या घरी पत्नी प्रियंका जोतीराम करे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तुझे वागणे बरोबर नाही, त्यामुळे आमची नातेवाईक व जनमाणसात बदनामी होत आहे, असे म्हणून गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर दि. २८ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून तिचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ढेकूगाव ते परधाडी घाटात निर्मनुष्य ठिकाणी टाकून दिला.
ज्योतीरामने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी शोध घेतला असताना प्रियंकाच्या मृतदेहाचा सापळा मिळून आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे हे करत आहेत.





