दौंड : न्यूज कट्टा
बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळं आलेल्या नैराश्यातून दौंड तालुक्यातील राहू परिसरातील एका विद्यार्थीनीनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ही घटना घडली असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षदा बबन पवार (वय १७) असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. दौंड तालुक्यातील पिलाणवाडी येथे तिचं कुटुंबीय वास्तव्यास आहे. हर्षदा हिला दहावीत ८७ टक्के गुण मिळाल्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. शिक्षणात हुशार असल्यामुळे बारावीत चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा सर्वांनाच होती.
सोमवारी दुपारी निकाल लागल्यानंतर हर्षदाला ५५ टक्के गुण मिळाल्यानं हर्षदा नाराज झाली. त्यातूनच तिनं राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तिचे वडील कामावरून परतल्यानंतर बराच वेळ दार उघडत नाही हे पाहून त्यांनी खिडकीतून आत डोकावले. त्यानंतर शेजारील लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हर्षदाने गळफास घेतल्याचं दिसून आलं.
शिक्षणात हुशार असलेल्या हर्षदाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी हर्षदाचे वडील बबन पवार यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.





