कोपरगाव : न्यूज कट्टा
इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवत बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून भावाबहीणींनी मिळून एका युवकाचं अपहरण करत अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव परिसरात त्याला मारहाण करत विष पाजून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी चौघांना अटक केली असून एक महिला आरोपी फरार आहे.
साईनाथ गोरक्षनाथ काकड (वय २४, रा. डोऱ्हाळ, राहता) असं या घटनेत मृत पावलेल्या युवकाचं नाव आहे. रुपाली संजय लोंढे, अनिल संजय लोंढे, दिनेश विठ्ठल आसने, राहुल अशोक चांदर या चौघांसह एका अल्पवयीन मुलावर कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, साईनाथ आणि रुपाली लोंढे हे दोघे एकमेकांना ओळखत होते. ते पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होते.

या दरम्यान, साईनाथ याने रुपाली लोंढे हिच्या बहिणीला इस्टाग्रामवरुन मेसेज करुन शिवीगाळ केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून रुपाली लोंढे, अनिल लोंढे, दिनेश आसने, राहुल चांदर आणि एक अल्पवयीन बालक अशा पाचजणांनी पुण्यात साईनाथ राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला घरातून ओढत चारचाकी वाहनात टाकून कोपरगाव येथील कोकमठाण गावाच्या हद्दीत घेऊन आले.
त्या ठिकाणी त्याला सर्वांनी बेदम मारहाण केली. तसेच विषारी औषध पाजत त्याचा खून केल्याची फिर्याद मयत साईनाथच्या भावाने दिली आहे. दरम्यान, साईनाथला चारचाकीत घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात पाच जणांवर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १४० (१),१८९ (२), १९१ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी रुपाली लोंढे ही घटनेनंतर फरार झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून एका युवकाला जीव गमवावा लागल्यामुळे खळबळ उडाली आहे.





