बारामती : न्यूज कट्टा
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून एप्रिल महिन्यात आत्महत्या केली होती.. आता याच अंकिताचा दहावीचा निकाल काल जाहीर झाला असून त्यामध्ये ७८.४० टक्के गुण मिळवत ती शाळेत पहिली आली आहे. मात्र तिचं हे यश पाहायला तीच या जगात नाही.
अंकिता कडाळे ही बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील सामान्य कुटुंबात वाढलेली अभ्यासू आणि हुशार मुलगी. दररोज शाळेत जायचं, नियमित अभ्यास आणि घर असा तिचा दिनक्रम. मात्र गावातीलही काही गावगुंडांची तिच्यावर असलेली वाईट नजर तिच्या जीवावर बेतली. गावातील विशाल दत्तात्रय गावडे हा आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे यांच्यासोबत अंकिताचा पाठलाग करत तिला त्रास देत होता.
माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या घरच्यांना खल्लास करीन, यात्रेपूर्वी माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आईवडिलांना सोडणार नाही अशा धमक्या तिला दिल्या जात होत्या. त्यातूनच तिनं ८ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून एका आरोपीला अटकही करण्यात आली आहे.
या घटनेनंतर काल अंकिताचा दहावीचा निकाल जाहीर झाला. कोऱ्हाळे खुर्द इथल्या भैरवनाथ विद्यालयात तिनं प्रथम क्रमांक मिळवला. मात्र तिचं हे यश पाहायला ती स्वत: या जगात नाही. इतकंच काय तर तिचं डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचं स्वप्नही अधूरं राहिलं आहे. गावगुंडांचा त्रास तिच्या जीवावर बेतलाच, मात्र सोबतच तिच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडाच झाला.
अंकिताचा निकाल पाहिल्यानंतर तिच्या आईनं अक्षरश: हंबरडा फोडला. माझी सोन्यासारखी लेक आज या जगात नाही. मात्र तिला मानसिक त्रास देणारे आजही मोकाट आहेत. अंकिताला जर खरंच न्याय द्यायचा असेल तर त्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, हीच तिला श्रद्धांजली ठरेल असं तिच्या कुटुंबियांनी हतबल होत सांगितलं.





