बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समोर कुणीही असलं तरी तुल्यबळ समजूनच नव्या-जुन्यांचा समावेश असलेला पॅनल उभं करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्याचवेळी प्रचाराचा शुभारंभ करतानाच माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष कोण असेल ते नाव जाहीर करणार असल्याचं अजितदादांनी जाहीर केलं आहे. त्याचवेळी माळेगावच्या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित मेळाव्यात अजितदादा बोलत होते. माळेगाव कारखान्याची निवडणूक अनेक विरोधक लढवतील. किती पॅनल होतील हे १३ जूनलाच स्पष्ट होणार आहे. मात्र काहीही झालं तरी माळेगावच्या निवडणुकीत आपला पॅनल असणारच आहे. त्यामध्ये नव्या जुन्यांचा मेळ घालून उमेदवार निवडण्यावर आपला भर असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं.
निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करतानाच कारखान्याचा अध्यक्ष कोण असेल हे आपण जाहीर करणार आहोत. छत्रपती कारखान्याच्या वेळीही आपण पृथ्वीराज जाचक यांचं अध्यक्षपदासाठी नाव जाहीर केलं. तसंच आताही करणार असल्याचं अजितदादांनी सांगितलं. समोर निवडणूक लढवणारे तुल्यबळ आहेत असं समजूनच आपण ही निवडणूक लढणार असून सभासदांना आपली भूमिका योग्य पद्धतीने पटवून देऊ असंही त्यांनी जाहीर केलं.
कारखाना चांगला चालावा, सभासदांना योग्य दर मिळावा हाच कायम हेतू ठेवून माळेगाव कारखान्याचा कारभार केला आहे. यापुढेही आपली भूमिका हीच असणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाची सर्व ती मदत आपण माळेगावसाठी उपलब्ध करून सभासदांना अधिकचा दर देण्यासाठी प्रयत्नशील असू असंही अजितदादांनी यावेळी नमूद केलं. येणाऱ्या काळात कारखान्याच्या कामकाजात बारकाईने लक्ष देणार असल्याचे संकेतही यावेळी त्यांनी दिले.





