BARAMATI BREAKING : बारामतीत पावसाचा हाहाकार; भल्या पहाटेच अजितदादांकडून नुकसानीची पाहणी, नागरीकांना दिला धीर..!

बारामती : न्यूज कट्टा

गेल्या तीन चार दिवसांच्या संततधार पावसानंतर बारामती शहर आणि तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले सर्व दौरे, कार्यक्रम रद्द करत काल रात्रीच बारामतीत येत नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर आज पहाटेपासून त्यांनी नुकसानीची पाहणी करत नागरीकांना धीर दिला.

बारामती शहर आणि तालुक्यात मागील १०० वर्षात झाला नाही इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्याचा फटका शहर आणि ग्रामीण भागात बसला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात तर गावांचा संपर्कही तुटला असून काल पिंपळी लिमटेक येथे निरा डाव्या कालव्याला भगदाड पडल्याचीही घटना घडली होती.

या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच प्रशासनाकडूनही नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सायंकाळीच बारामतीत दाखल होत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच काल रात्री काही भागात पाहणी करत प्रशासनाला सुचना दिल्या.

त्यानंतर आज सकाळी ६ वाजताच अजितदादा नुकसानग्रस्त भागात पाहणीसाठी पोहोचले. त्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती घेत योग्य त्या कार्यवाहीच्या सुचना प्रशासनाला दिल्या. मागील १०० वर्षात झाला नाही इतका पाऊस बारामतीत झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र अतिवृष्टीमुळे त्रास होवू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बारामतीत प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून कोणतीही अडचण आल्यास त्वरीत संपर्क साधण्याचं आवाहन अजितदादांनी केलं. बारामतीत निर्माण झालेल्या पूरस्थितीत नागरीकांनी घाबरुन जाऊ नये,  अफवांना बळी पडू नये असं सांगत प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!