बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५९३ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब वर्ग प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुक २२ जून रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आतापर्यंत ५९३ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये विद्यमान संचालक बाळासाहेब तावरे, अध्यक्ष केशवराव जगताप, योगेश जगताप, नितीन सातव, अनिल तावरे आदींचा समावेश आहे.

दरम्यान,उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब वर्गातून अर्ज दाखल करण्यात आला आहे. बारामती खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी म्हणून अजितदादांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जिल्हा बॅंक संचालक दत्तात्रय येळे आणि बाजार समितीचे माजी सभापती सुनिल पवार यांच्या या अर्जावर सुचक व अनुमोदक म्हणून सह्या आहेत.
माळेगावच्या निवडणुकीत थेट अजितदादांचा अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणुक रंगतदार ठरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारखान्याच्या कामकाजात स्वत: बारकाईने लक्ष देणार असल्याचं अजितदादांनी जाहिर केलं होतं. त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे आता अजितदादा संचालक मंडळात सहभाग घेतात का याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.





